
भारतीय ओटीटी विश्वात जेव्हा ऍक्शन, थ्रिलर आणि राजकारणाने भरलेल्या वेबसिरीज येत होत्या, तेव्हा एका साध्याशा गावात, एका छोट्याशा पंचायत कार्यालयात सुरू झाली एक अशी गोष्ट, जी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली. ही गोष्ट म्हणजे ‘पंचायत’.
अमेझॉन प्राईम वरची एक वेबसिरीज जी वेळोवेळी सिद्ध करत गेली की, मोठं बजेट, भव्य लोकेशन्स किंवा जबरदस्त व्हीएफएक्स शिवायही एक उत्कृष्ट कलाकृती बनू शकते. कथा आहे साधी, पण मांडणी अफलातून आहे. कथेचा नायक – अभिषेक त्रिपाठी, एक तरुण जो एमबीए करण्याचं स्वप्न उराशी बाळगतो आणि नाईलाजाने उत्तर प्रदेशमधील फुलेरा या गावात ग्रामसेवक म्हणून रुजू होतो. आणि मग सुरू होतो त्याचा गावातलं जग समजून घेण्याचा प्रवास, कधी कंटाळवाणा, कधी गमतीशीर, कधी भावुक.
सुरुवातीला त्याला वाटत की त्याची नोकरी ही एक सरकारी नोकरी नसून एखादी शिक्षा असावी. एवढा तो त्या नोकरीला कंटाळलेला असतो पण हीच शिक्षा, पुढे त्याचं आयुष्य समृद्ध करत जाते.

रघुबीर यादव (प्रधानजी), नीना गुप्ता (मनजू देवी), फैसल मलिक (प्रह्लाद), चंदन रॉय (विकास), भूषण, विनोद यांनीही इतका नैसर्गिक अभिनय केला आहे की ते पात्र वाटत नाहीत ते अक्षरश गावातली असल नागरिक वाटतात.
सुरुवातीला मनाला खिळखिळून हसणारी ही कथा, नंतरच्या सिजनमध्ये बऱ्याचदा मनाला भिडते. काही प्रसंग मनाला चटका लावूनही जातात.
शहरी आणि ग्रामीण मानसिकतेतील फरक, सरकारी यंत्रणेतील गोंधळ, मानवी संबंधातील गुंतागुंत हे सगळं फारच सहज मांडलं गेलं आहे.
काही खास गोष्टी:
१. वेबसिरीजचे लेखन चंदन कुमार यांनी केलं असून, दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांचं आहे. IMDb वर ही वेबसिरीज 9.0+ रेटिंगसह टॉपवर आहे.
२. पहिला आणि दुसरा सिझन अत्यल्प बजेटमध्ये शूट केला गेला होता, पण दर्जा उच्च दर्जाचा होता. गावाचं नाव ‘फुलेरा’ हे काल्पनिक असलं तरी शूटिंग उत्तरप्रदेश मधल्या खऱ्या गावात झालं आहे.
‘पंचायत’ ही केवळ एक वेबसिरीज नाही, ती ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर लक्ष टाकते. ही सिरीज मनाला हसवते, मनाला भिडते आणि नकळत रडवतेही. आजही अनेक मोठ्या बजेटच्या सिरीज कंटाळवाण्या वाटतात, पण ‘पंचायत’ पाहताना तसं कुठेही होत नाही. आज ‘पंचायत’ ही सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट भारतीय वेबसीरिज म्हणून ओळखली जात आहे.